गायकर व वाकचौरे यांचा पिचडांना पहिलाच दणका.! वैभव पिचडांचा कारणामा आणला चव्हाट्यावर.! भाजप ऑफिसात सावंतांवर दबाव आणून दुधसंघाचा ठराव केला.!

   


- सागर शिंदे  

सार्वभौम (अकोले) :-

 संपुर्ण अकोले तालुका गाढ झोपेत असताना तालुक्यात गायकर वर्सेस पिचड यांच्या गटबाजीत प्रचंड गदारोळ पहायला मिळाला. एकीकडे साखर कारखान्याचे इलेक्शन पेट घेत असताना दुधसंघात देखील राजकारण उतु जाताना दिसत आहे. कारण, एकीकडे कैलास वाकचौरे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होताच दुधसंघात गायकर साहेबांचे बहुमत सिद्ध झाले. त्यामुळे, महानंद दुधसंस्थेच्या निवडणुकीसाठी जो ठराव गरजेचा असतो. तो चेअरमन वैभव पिचड यांनी अल्पमतात (5 संचालक) तो मंजुर करण्याचा घाट घातला. तर, बहुमतात असणार्‍या विठ्ठल चासकर (9 संचालक) यांचा ठराव नामंजूर दाखवून दुधसंघाचे जनरल मॅनेजर दादाभाऊ सावंत यांना भाजप कार्यालयात बोलावून त्यांच्यावर दबाव आणून त्यांच्याकडून वैभव पिचड यांनी ठराव करून घेतला. जेव्हा चासकर यांचा ठराव 9 संचालकांनी मागितला तेव्हा सावंत यांनी देतो, करतो, पाहतो अशी उत्तरे देऊन वेळकाढूपणा केला आणि नंतर मोबाईल बंद करुन टाकला. त्यानंतर रात्री 11 वाजण्याच्या सुमारास सावंत यांनी संचालक शरद चौधरी यांना फोन करुन सांगितले. की, ठराव हा वैभव पिचड यांचा केला आहे तर चासकर यांचा ठराव त्यांनी मला करु दिला नाही. माझ्यावर दबाव असल्यामुळे तो ठराव मी करू शकलो नाही. त्यावेळी सावंत यांनी सहकार कायद्याचे उल्लंघन केले आहे हे सिद्ध झाले. त्यामुळे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. अशी मागणी पत्रकाद्वारे करण्यात आली. यावेळी 9 संचालकांनी  रात्री 11 वाजता थेट अकोले पोलीस ठाणे गाठले होते. तर, हा बेकायदेशिर ठराव नामंजूर व्हावा, यासाठी हे 9 संचालक रात्री 3 वाजता नगरच्या एआर कार्यालयात जाऊन पोहचले होते. त्यामुळे, एकीकडे संयमाने महाविकास आघाडीला घाम फोडणारे भाजपचे देवेंद्र फडणविस आणि दबाव तंत्राचा वापर करुन अल्पमतातील ठराव अधिकार्‍यांना भाजप कार्यालयात आणून तो पास करण्याचा घाट घालणारे वैभवराव पिचड यांच्यात तालुक्यातील जनता तुलना करू लागली आहे.

संघावर नेमकी काय झालं?

 महा.राज्य सहकारी दुध महासंघ मर्या.मुंबई (महानंद) या संस्थेच्या सन 2022-23 ते 2027-28 या कालावधितील निवडणुकीत अमृतसागर दुधसंघ अकोले यांचा प्रतिनिधी म्हणून एका व्यक्तीचा बहुमताने ठराव द्यावा लागतो. त्यामुळे, दि. 20 जून 2022 रोजी दुपारी 3:30 वाजता चेअरमन यांच्या आदेशाने जनरल मॅनेजर यांनी 14 संचालकांना सभेची नोटीस काढली होती. त्या मिटिंगमध्ये कोणाचा ठराव करायचा असा विषय पुढे आला. तेव्हा, पाच व्यक्तींनी वैभव पिचड यांचे नाव पुढे केले. तर, गायकर गटाच्या 9 जणांनी विठ्ठल चासकर यांचे नाव पुढे केले. अर्थात बहुमत चासकर यांच्या बाजुने असल्याने भाऊपाटील नवले यांनी सुचना मांडली आणि रविंद्र हांडे यांनी अनुमोदन दिले. विषय अगदी सुटसुटीत होता. तेव्हा शरद चौधरी यांनी जनरल मॅनेजर यांना ठराव बनविण्यास सांगितला. त्यावेळी सभेचा कोरम पुर्ण व्हावा म्हणून सर्वांनी (14 संचालकांनी) सह्या देखील केल्या होत्या. पुढे घात होईल अशी जरा देखील कल्पना नसल्याने काही संचालक निघून गेले. तर, काही ठरावाची वाट पाहत होते. मात्र, थोड्या वेळाने ठरावाची नक्कल देतो असे म्हणून त्यांनी वेळ मारून नेली.

भाजप ऑफिसमध्ये काय झालं?

वैभव पिचड यांचा यापुर्वीचा साखर कारखान्याचा ठराव समांतर (सात-सात) मतांमुळे रद्द ठरला होता. त्यामुळे, तालुक्यात नव्हे, राज्यात तरी त्यांना महानंदवर प्रतिनिधीत्व करण्याची इच्छा असावी. त्यामुळे, त्यांना अवघी पाच मते असताना देखील त्यांनी 9 च्या बहुमताला न जुमानता संघाचे जनरल मॅनेजर दादाभाऊ सावंत यांना अकोल्यातील भाजप कार्यालयात बोलावून घेतले. शरद चौधरी हे सावंत यांना फोन करीत असताना देखील मुद्दाम उडवाउडविची उत्तरे दिली गेली. 6 वाजता ठराव देणार होते. दोन दिवस जमा करण्यास मुदत आहे असे सांगून देखील त्यांनी टाळाटाळ सुरू ठेवली होती. नंतर मात्र त्यांचा फोन न घेता त्यांनी तो बंद केला आणि पिचड यांचा अल्पमताचा ठराव भाजप कार्यालयात तयार होऊ लागला. त्यानंतर रात्री 10:30 वाजता सावंत यांनी चौधरी यांना फोन करुन सांगितले. की, दुधसंघाचे चेअरमन वैभव पिचड यांनी माझ्यावर प्रचंड दबाव आणून त्यांचा ठराव लिहिण्यास भाग पाडले. त्यामुळे, मिटींगमध्ये ज्याचे बहुमत होते त्या विठ्ठल चासकर यांचा ठराव लिहिता आला नाही. असे सावंत यांनी सांगितल्याचे पोलीस ठाण्यात दिलेल्या अर्जात म्हटले आहे.

गायकर व वाकचौरेंचा पिचडांना दणका.!

दुधसंघाला एकुण तीन ठराव असतात. जिल्हा बँकेच्या ठरावावेळी गायकर साहेब हे पिचड साहेबांशी संलग्न होते. त्यामुळे, तेव्हा मा.आ.वैभव पिचड यांचा ठराव सहज होऊन गेला. त्यानंतर अगस्ति सहकारी साखर कारखान्याच्या ठरावाच्या वेळी दुधसंघाचे चेअरमन वैभव पिचड यांनी स्वत:चा ठराव करुन तो पाठविला होता. मात्र, तेव्हा त्यांच्या सोबत गायकर साहेब नव्हते. त्यामुळे, त्यांच्या गटाने गैरहजर राहुन प्रचंड विरोध दर्शविला आणि 14 पैकी 7 अशी संख्या राहिली. अर्थात सातजण गैरहजर असल्यामुळे सभेचा कोरम पुर्ण झाला नाही. तरी देखील वैभव पिचड यांचा ठराव पाठविण्यात आला होता. मात्र, त्यावर सात जणांनी अक्षेप घेतला आणि अखेर तो ठराव नामंजूर झाला. ही सल पिचड यांच्या मनाला प्रचंड बोचली. त्याच वेळी राष्ट्रवादीसह अन्य आंदोलकांनी गायकर पाटील यांचा अगस्ति ऐज्युकेशनच्या कायम विश्वस्त पदाचा राजिनामा मागितला. गायकरांनी तो हसत-हसत दिला. तेव्हा मात्र, दुधसंघाचा वचपा म्हणून पिचडांनी गायकरांसह चौघांचे राजिनामे तडक मंजुर केले. आता, कैलास वाकचौरे हे पुन्हा राष्ट्रवादीत आले आहेत. त्यामुळे, त्यांच्यासह दुधसंघाचे दोन संचालक गोरक्ष मालुंजकर आणि विठ्ठल डुंबरे हे देखील राष्ट्रवादीत आले आहेत. त्यामुळे, गायकरांचे पुर्वी 7 संचालक होते. त्यात विठ्ठल चासकर, शरद चौधरी, भाऊपाटील नवले, सोपान मांडे, सुभाष बेनके, रविंद्र हांडे आणि रेखा नवले, आता हे 9 झाले आहेत.  त्यामुळे, पिचड कुटुंबाला हा गायकर व वाकचौरे यांनी पुन्हा मोठा दणका दिला आहे. तर, अताऐसो मधील तावताव गायकरांचा राजिनामा मंजुर करणाऱ्या पिचडांना इस्पिक वरचड एक्का असा इंगा दाखविल्याचे बोलले जात आहे.

आता पुढे काय?

खरंतर, सहकार कायदा असे सांगतो की, कोणत्याही संस्थेत एखादा ठराव पास करायचा असेल तर त्यासाठी बहुमत असावे लागते. बहुमतात असलेल्या व्यक्तीला सुचक अनुमोदक होऊन ठराव जनरल मॅनेजरने तो तयार करुन एआर कार्यालय अ.नगर येथे पाठवत असतो. तेथे रजिस्टर होऊन तो ठराव मुंबईला संबंधित कार्यालयात जमा करावा लागतो. ही सर्वसाधारण प्रक्रिया आहे. आता वैभव पिचड यांनी अल्पमतात स्वत:चा ठराव करुन घेतला आहे. त्यामुळे, पहिल्यांदा एआर कार्यालयात जाऊन संबंधित ठरावावर अक्षेप नोंदविणे. आमची फसवणुक झाल्याचे सांगून तो ठराव रद्द करून सभेमध्ये जे कोरम पुर्ण असताना ज्याच्या नावे ठराव केला होता. त्याचे नावे करून तो नगर येथून राजिस्टर केला पाहिजे. तर, तो ठराव घेऊन मुंबईला संबंधित कार्यालयात बायहॅण्ड पोहच केला पाहिजे. तर, ज्या जनरल मॅनेजरने कामात दिरंगाई केली, संचालकांचा विश्वासघात केला, फसवणुक केली. त्यांच्यावर फौजदारी कलम 420 नुसार गुन्हा दाखल केला पाहिजे. तर, पुढील सहकार पातळीवर देखील कारवाईसाठी पत्रव्यवहार केले पाहिजे. यात शरद चौधरी हे मास्टर असून ते ही प्रक्रिया पार पाडतील असे अनेकांना वाटते आहे.