पिचडांचा गडही गेला आणि सिंहही गेला.! कारखाना 11 संचालक, मार्केटचे 10 सदस्य, दुधसंघाचे 8 संचालक आणि गावोगावचे नेते.! पिचडांकडे राहिले कोण?



- सागर शिंदे

सार्वभौम (अकोले) :-

                        पिचड भाजपत गेल्यानंतर अकोले तालुक्यात सर्वात मोठा राजकीय भूकंप झाला होता. त्यानंतर ज्या अंतर्गत हलचाली होत होत्या, त्याचा पुन्हा एकदा फार मोठा उद्रेख झाला असून आता पिचड यांचा गड (विधानसभा) तर 2019 साली गेलाच होता. त्यानंतर त्यांना पुन्हा एक मोठा धक्का बसला असून त्यांचा सिंह देखील स्वागृही परतला आहे. कारण, सिताराम पाटील गायकर यांच्यासोबत आगस्ति सहकारी साखर कारखाण्याचे 11 संचालक, मार्केट कमिटीच्या सभापतींसह 10 सदस्य तर दुधसंघाचे 8 संचालक यांच्यासह गावागावातून हजारो पुढार्‍यांनी या बहुजन नेत्याच्या पावलावर पाऊल ठेऊन राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, आता खर्‍या अर्थाने पिचड पिता-पुत्र एकटे पडल्याचे बोलले जाऊ लागले आहे. तर चारदोन डोक्यांना घेऊन माजी आमदारांनी जे काही राजकारण करु पाहिले आहे. त्याला आता हे नेते प्रचंड वैतागले असून जे हवं ते आम्हालाच अशा प्रकारची भूमिका या बहुजन नेत्यांच्या डोईजड झाली आहे. त्यामुळे, ही सुप्त लाट पुन्हा पवार साहेबांच्या कुशित जाऊन स्थिरावली आहे. 16 मार्च 2021 रोजी हजारो नेते पुन्हा राष्ट्रवादीत दाखल होण्यासाठी आज तालुक्यातून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे.

खरंतर जिल्हा बँक म्हणजे जिल्ह्याचे आर्थिक नेतृत्व तेथून होते. तर आज कारखाण्याला पुन्हा सुगीचे दिवस आणायचे असेल तर जिकडे जिल्हा बँक तिकडे तालुका वळाला पाहिजे. आजवर पिचड राष्ट्रवादीत होते तोवर तालुक्याने त्यांना साथ दिली. मात्र, त्यांच्या भाजप प्रवेशाने सगळे चित्र येथे बदलुन गेले. गायकर यांनी देखील ऐनवेळी तालुक्याच्या विकासाचे राजकारण पुढे करीत संबंध बहुजन समाज एक केला आणि दादांच्या शब्दाखातर पिचडांना एकटे पाडण्यात हातभार लावला. गायकर यांच्या पाठीशी राजकीय आणि सहकाराचा प्रचंड मोठा अनुभव आहे. त्यामुळे, त्यांनी आत्तापर्यंत नातेगोते संभाळत राजकारण देखील तितकेच प्रगल्भ पद्धतीने हताळले आहे. त्यामुळे, ते जिकडे जातील तिकडे त्यांच्या पाठीशी फार मोठा लावाजमा दिसतो आहे. आज ते भाजप सोडून राष्ट्रवादीत दाखल होत आहेत. त्यामुळे, त्यांच्या पाठोपाठ तालुक्यातील सर्वच शिक्षण संस्थेतील आणि स्थानिक स्वराज्य संस्थेतील नेत्यांनी भाजपमधून काढता पाय घेतला आहे.

यात असेल बोलले जाते की, सहकारी साखर कारखाण्यातील संचालक कचरुपाटील शेटे, गुलाबराव शेवाळे, रामनाथ वाकचौरे, सुनिल दातीर, प्रकाश मालुंजकर, अशोक देशमुख, भास्कर बिन्नर, बाळासाहेब देशमुख हे गायकर पाटील यांच्यासोबत जाऊ शकतात, तर मार्केट कमिटीमध्ये कार्यरत असणारे विद्यमान सभापती पर्वत नाईकवाडी, सुधिर शेळके, मुरली ढोन्नर, रोहिदास भोर, पुंजापाटील वाकचौरे, संगिता गोडसे, हौसाबाई हांडे, विजय अस्वले, दिलावर शेख, निवृत्ती कचरे यांच्यासह अन्य नेत्यांचे मार्केट गायकर पाटील यांच्यामागे जाण्याची शक्यता आहे. तर दुधसंघातून भाऊपाटील नवले, दुधसंघाचे माजी मॅनेजर विठ्ठल चासकर, शरद चौधरी, माजी चेअरमन विठ्ठल डुंबरे तर रोज 3 हजार दुध संकलन देणारे पिपळदरीचे मांडे, भाऊसाहेब हांडे यांचे नातू रविंद्र हांडे, रेखा नवले, सुभाष बेनके यांच्यासह अन्य संचालक त्यांच्यासोबत जाण्याची दाट शक्यता आहे. तर या पलिकडे वैभव पिचड यांना पडत्या काळात आजवर साथ दिलेले आणि राजकीय व्यसपिठावर विरोधकांची धुळदान करणारे विकास शेटे याच्यासारखे अन्य तरुण निष्ठावंत देखील गायकर पाटील यांच्या पाऊलावर पाऊल ठेऊन राष्ट्रवादीत चालते झाले आहे. तर माजी उपनगराध्यक्ष प्रकाश नाईकवाडी, नगरसेवक भोईर गुरुजी यांचे कुटुंब यांच्यासह अनेक नगरसेवकांनी गायकर पाटील यांना पाठींबा दिला आहे. मात्र, त्यांनी नाव न छापण्याची अट घातली आहे. या पलिकडे शिवसेनेने गायकर यांचे महाविकास आघाडीत स्वागत केले आहे. त्यामुळे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र धुमाळ, कारखाण्याचे संचालक महेश नवले व अशोक आरोटे हे देखील त्यांच्या पक्षप्रवेशासाठी मुंबईला जाण्याची शक्यता आहे.

एकंतर 16 तारखेला तालुक्यात वेगळेच चित्र पहायला मिळणार आहे. पिचड साहेबांच्या एका निर्णयाने अनेकांना राजकारणात स्थैर्य मिळाले तर अनेकांच्या चुली बंद पडल्या आहेत. अनेक पक्षांना उभारी मिळाली तर येथील बहुजन नेत्यांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव होऊ लागली आहे. पिचड यांनी एकच असा वजिर असा तयार केला होता. ज्याने त्यांना स्वत:ला चेक अ‍ॅण्ड मेट करु पाहिले आहे. आता नेते व जनता यांच्यात फार मोठी दरी निर्माण झाली आहे. त्यामुळे, कार्यकर्त्यांच्या मनात देखील प्रचंड अस्वस्थता दिसून येत आहे. गायकर पाटील एक बहुजन नेता म्हणून त्यांच्याकडे जीव ओढला जातो तर भाऊ आणि माजी मंत्री म्हणून अनेकांच्या निष्ठेची परिक्षा येथे होऊ घातली आहे. तर सालं हे राजकारण लै गचाळ असे म्हणत अनेकांनी आपला वैताग व्यक्त केला आहे.

एकंदर आता तालुक्यात पिचड एकटे पडण्याची ही दुसरी ऐतिहासिक वेळ आहे. 1995 ते 2020 या काळात फार काही अमोलाग्र बदल झाले आहेत. मात्र, बहुजन म्हणून जी काही मोट बांधण्याचे काम गायकर यांनी केले आहे. त्याला बाकी खरोखर सॅल्युट केला पाहिजे. नाते गोते संभाळून त्यांनी सर्वांना आपल्या पाठीशी उभे ठेवले हे सर्वात मोठे संघटन कौशल्य म्हणावे लागेल. यात कचरुपाटील शेटे यांची महत्वाची भूमिका राहणार आहे. तर अशोक देशमुख यांनी देखील त्यांच्या राजकीय ताकतीला सिद्ध करुन गावात आपली सत्ता आणली आहे. तसेही ते पुर्वाश्रमीचे गायकर प्रेमी असून त्यांच्या पाठीशी देखील राजकारणाचा दंगडा अनुभव आहे. त्यामुळे, येणार्‍या काळात कारखाना तथा जिल्हा परिषद यांच्यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर अशा व्यक्तींची गायकर पाटील यांना गरज पडणार आहे. यांच्यासह अनेक मात्तबर नेते पाटलांच्या दिमतीला असतील तर येणार्‍या काळात तालुक्यात राष्ट्रवादी पक्ष अधिक मजबुत होत जाऊ शकतो.

क्रमश: भाग 1