सोनाली ताईंचा राजकीय सोनेरी प्रवास.! ताई भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा.!


सार्वभौम (अकोले) :- 
              सन 1985 साली अकोले तालुक्यातील शिवसेनेच्या शिवाजीराजे या वाघाने एक नवी उभारी घेतली होती. तर याच समांतर काळात अकोले तालुक्यात पाटपाण्याचा प्रश्न उभा ठाकला होता. तर दुसरीकडे राज्यात सगळी राजकीय गणिते बदलत होती. अर्थातच तेव्हा शिवसेनेच्या बैठका शिवाजीराजे धुमाळ यांच्या घरात मोठ्या नेटाने संपन्न होत होत्या. तर दुसरीकडे याच घरात 4 फेब्रुवारी 1985 रोजी भविष्यातील एका महिला नेतृत्वाचा उदय होऊन अभिमन्युप्रमाणे राजकीय चक्रव्यूह छेदण्यासाठी सोनालीताई यांचा जन्म होऊ घातला होता. त्यावेळी घरात मात्तब्बर राजकारण्यांची उठबस होत होती, राज्याच्या चळवळीला दिशा देेणार्‍या चर्चा याच राजगडावर होत होत्या आणि हेच बाळकडू सोनालीताई हळूहळू समजून घेत होत्या. म्हणतात ना.! "बाळाचे पाय पाळण्यात दिसतात". अगदी तसेच झाले, नकळत ताईंवर राजकीय संस्कार होऊ लागले आणि आज बोलबोल करता त्यांनी बापाच्या पावलावर पाऊल ठेऊन काल जे शिवाजीराजे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष होते. आज त्यांचीच थोरली कर्ती लेक भाजपची महिला जिल्हाध्यक्ष झाली आहे. हे क्षण त्यांच्या कुटुंबियांसाठी अगदी "सुवर्णाक्षरांनी" लिहावे इतके आनंद व प्रेरणादायी ठरले आहे. तर ताईंच्या नितळ, निर्मळ व प्रेमळ स्वभावामुळे त्यांनी जे काही राजकीय साम्राज्य कमविले आहे. त्यामागे त्यांचे वडिल तर आहेच. मात्र, एक "दिपस्तंभा"सारखा सखा सोबती म्हणून पतीराजे चेतनशेठ नाईकवाडी यांचे देखील तितकेच अनमोल योगदान आहे, यात तिळमात्र शंका नाही. 
खरंतर छत्रपती शिवाजी महाराजाना शंभुराजे घडवायचे होते. म्हणूनतर 1666 साली वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी संभाजीराजांना घेऊन त्यांनी आग्रा गाठला होता. संकटात पडल्याशिवाय त्याचा सामना करण्याचे सामर्थ्य बाहुत भरत नाही. यावर राजे ठाम होते. अगदी तोच पायंडा शिवाजीराजे धुमाळ यांनी स्वत:च्या लेकीबाबत आजमविला होता. कारण, वयाच्या अवघ्या 6 वर्षापासून ते आपल्या लेकीला भल्याभल्या स्टेजवर घेऊन जात असत. तीच खरी जडणघडण सोनाली ताईंना कणकण उभारी देत होती. जेव्हा शाळेत जायचे वय होते. तेव्हापासून राजकीय व्यासपीठांचे धडे गिरविण्याचे महत भाग्य त्यांच्या भाळी लाभले होते. शाळा आणि महाविद्यालयीन जीवनात प्रचंड धटींग करुन आरेला कारे उत्तर देण्याचे सामर्थ्य ताईंमध्ये नकळत निर्माण झाले होते.
 
            सन 2000 साली 10 वी पुर्ण झाल्यानंतर 2005 साली त्यांनी बीएची परिक्षा पास केली. या दरम्यान विद्यार्थी दशेत कधी त्यांना राजकारणात स्वारस्य वाटले नाही. मात्र, मुलींचे प्रश्न, विद्यार्थ्यांच्या फी ची समस्या आणि छेडछाड यावर ताई म्हणजे एक जालीम औषध होऊन गेल्या होत्या. सन 2007 साली त्यांनी एक डिप्लोमा पुर्ण केला आणि पुढे एलएलबी सुरू असतानाच 2009 साली त्यांच्या डोक्यावर मंगल अक्षदा पडल्या. सुदैवाने चेतनशेठ आणि सोनालीताई यांच्यात इतकी प्रगल्भ मैत्री झाली की, त्यांनी ताईंच्या पाठीवर नेहमी हात ठेऊन "लढ म्हणत" त्यांच्या पंखात बळ भरले. मोठ्या घरच्या स्त्रीया म्हणजे "चुल आणि मुल." यापलिकडे जाऊन चेतनशेठ यांनी समाजाला एक नवा आदर्श दाखवून दिला. लग्नानंतर देखील ताईंचे एलएलबीचे अपुर्ण शिक्षण त्यांनी पुर्ण केले. "तू लढ मी आहे." असे म्हणत त्यांनी ताईंच्या स्वप्नांना नेहमी वेगळी दिशा देण्याचे काम केले.  
        तुम्हाला आश्चर्य वाटेल की, 2012 साली जेव्हा सोनालीताई यांनी खर्‍या अर्थाने राजकारणात पाय रोवू पाहिले तेव्हा त्यांची मुलगी अवघ्या सहा महिन्यांची होती. अशा परिस्थितीत त्यांचे कुटुंब ताईंच्या पाठीशी अगदी ठामपणे ऊभे होते. कारण, त्यावेळी पहिल्यांदाच त्या धामणगाव गणातून निवडणुक लढवत होत्या. तेव्हा राष्ट्रवादीचे शिट पडले व आप्पासाहेब आवारी यांचा विजय झाला. तेव्हा देखील खर्‍या अर्थाने यश अपयशाची गणिते त्यांना अनुभवायला मिळाली. तेव्हापासून ताई राजकारणात सक्रिय झाल्या. महिलांचे प्रश्न घेऊन त्यांनी अनेकांचे संसार पुन्हा मार्गावर आणले. तालुक्यात कौटुंबिक वादातून जे काही नवरा बायको यांच्यात वाद आहेत. त्यांचे "समुपदेशन" करुन ताईंनी आजवर 10 ते 15 महिलांचे "संसार नव्याने उभे" केले आहेत. ही समाजासाठी फार प्रेरणादायी बाब आहे. पुढे सन 2014 साली राज्यातील राजकीय गणिते बदलली आणि त्यांनी आपल्या वडीलांच्या पावलावर पाऊल ठेऊन भाजपत प्रवेश केला.  
           त्यानंतर 2015 साली ज्या नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या. त्यात सोनालीताई नाईकवाडी यांनी पहिल्यांदाच शहरात "कमळ" फुलविले. कारण, प्रभाग क्रमांक 5 मधून त्यांच्यावर जनतेने भरभरुन प्रेम केले आणि त्यांच्यावर "गुलालाची उधळण" झाली. त्या दिवशी त्यांनी ठरविले होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या म्हणण्याप्रमाणे "ज्याच्या दाराशी जास्त चपला, तो खरा श्रीमंत." आज सुदैवाने चेतनशेठ नाईकवाडी यांचा दिलदार व दानशूर स्वभाव आणि ताईंची समाजाप्रती असणारी आत्मियता यामुळे त्यांच्या दारात सदैव चपलांचा ढिग असतो. विशेष म्हणजे या कोरोनाच्या महामारीत जेव्हा गोरगरिब लोक अन्न अन्न करीत होते. तेव्हा चार ते पाच लाख रुपयांचे अन्नधान्य व किराणा तसेच भाजीपाला या दाम्पत्याने वाटला होता.
        इतके "कर्णाच्या दानशूर" मनाचे हे कुटुंब सामान्य जनतेच्या अगदी उरात घर करुन बसले आहे. म्हणून तर गेल्या सात आठ वर्षाच्या कालखंडात ताईंनी जे आत्मियतेने काम केले आहे. त्याचे फलित म्हणून भाजपने त्यांची दखल घेतली आहे. ताई आज महिला जिल्हाध्यक्षा झाल्या आहेत. जिल्ह्यातील महिलांना साक्षर, सबळ आणि सक्षम करण्यासाठी त्यांचे प्रयत्न असणार आहे. त्यांच्या या कार्यास रोखठोक सार्वभौमकडून हार्दिक शुभेच्छा..!

- सागर शिंदे 

============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 500  दिवसात 800 लेखांचे 98 लाख वाचक)