जंगलातला पँथर सर्कशीत गेला, ज्याला रिपाईत दम दिसेना - आठवले.!
सर्वभौम (अहमदनगर) : -
"शंभर वर्षे शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस तरी वाघ होऊन जगा. कारण, बळी हा शेळ्या बकर्यांचा दिला जातो वाघाचा नाही" असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगत होते. मात्र, दुर्दैवाने आम्ही ज्यांना वाघ म्हणून संबोधत त्यांच्या हाती डॉ. बाबासाहेबांचा गाडा दिला तेच नेमकी शेळीसारखे निघाले आहे. ज्यांना एक दिवस का होईना गुरगुरत नाही तर शंभर दिवस लाचार म्हणून जागायचे आहे. ते इतके की, ज्या पक्षाने आपल्याला अनेकदा खासदार आणि आमदार बनवून लाल दिव्याच्या गाडीत बसविले. तो पक्ष म्हणजे अर्थशुन्य वाटावा.! म्हणजे ही तर आंबेडकरी चळवळ आणि थेट बाबासाहेबांशी गद्दारी केल्यासारखे आहे. म्हणजे पोट फुटून करगोटा तुटेपर्यंत जेवायचे आणि मागे हात लावून छे! या खाण्यात दम नाही असे म्हणत दात्याची कुचेष्टा करायची. हे असेच झाले की. त्यामुळे, रिपब्लिकनमध्ये दम नाही. असे जर कोणी म्हणत असेल तर तो कोणीही असो. त्याच्या शब्दांचा वाभाडे ओढल्याशिवाय हा आंबेडकरी समाज शांत बसणार नाही. अशा शब्दात आता भिमसैनिक नेत्यांच्या वक्तव्यवार ताशेरे ओढताना दिसत आहे. तर काल जे दलितांच्या जंगलाचे राजे होते. ते आज भाजपच्या सर्कशितले पाळीव वाघ झाले आहे. त्यामुळे, ज्यांनी स्वत:च्या सार्थपोटी चळवळ चविसारखी वापरली आणि आता उतारवायात त्यांना आंबेडकरवाद हा सारांशशुन्य वाटू लागला आहे. त्यांच्याप्रती भल्याभल्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
खरंतर अगदी लहानपणापासून डॉ. बाबासाहेबांनी दरवाज्याच्या उंबर्यापासून तर शाळेच्या दरवाजापर्यंत अनन्वीत अत्याचार, जातीयवाद आणि अस्पृश्यता भोगली आहे. म्हणूनतर "शिका, संघटीत व्हा, आणि संघर्ष करा" हा मुलमंत्र ते प्रत्येक बहुजन समाजातील लोकांना देऊन गेले. दुर्दैवाने जे शिकले त्यांनी खुद्द बाबासाहेबांशी घात केला तर आपण "किस झाड की पत्ती"! त्यानंतर आमच्यातून जे शिकले त्यांनी संघटन नक्कीच उभे केले मात्र, ते कशासाठी? तर "राजकारणात आपले स्थैर्य" उभे करण्यासाठी. भल्याभल्या ठिकाणी दलितांच्या खोंडोळ्या झाल्या, आया बहिनी भर दिवसा नग्न करुन मारल्या, नुकत्याच वयात आलेल्या मुलींवर सामुहिक बलात्कार झाले. त्याचे अंतीम सत्य काय? यामागचे वास्तव अपयश म्हणजे चळवळीचा सारांश शुन्य आहे. मात्र, नारेबाजी करत कालपर्यंत ज्यांनी महाराष्ट्रात डरकाळ्या फोडल्या ते आज सत्तेसाठी सर्कशीत काम करत आहे. त्यामुळे, आता आमचा संघर्ष हा रस्त्यावरचा नाही. तर आंबेडकरवाद पायंदळी तुडवत पद आणि प्रतिष्ठेपोटी चापलुसी करण्यासाठी आमचा संघर्ष सुरू आहे. आणि येणार्या वर्तमानात आता कोठे अंध:कारमय दिसू लागल्यामुळे आणि चळवळीच्या नावाखाली आणि निळ्या झेंड्याखाली पोटभर सत्ता उपभोगल्यानंतर चळवळीत काही दम राहिला नाही. असे वाटू लागले आहे. असे वाक्य म्हणजे ज्यांनी उभी हयात चळवळीसाठी आर्पन केली. त्यांच्या कळजावर जळजळीत तेजाब फेकल्यासारखे आहे.
वास्तवत: डॉ. बाबासाहेब गेल्यानंतर दलित समाजाला कोणी वाली राहिला नाही. जो तो उठला, लढला आणि जगला तो फक्त बाबासाहेबांच्या विचारांवर तर त्यांच्यानंतर रिपब्लिकन, दलित पँथर, मासमुव्हमेंट यांच्या माध्यमातून केवळ राजकारण होत गेले. जे प्रामाणिक होते ते लढले आणि निघून गेले. जे शातीर होते त्यांनी प्रस्तापित सामाजाशी हातमिळवणी केली आणि राजकारणा स्थैर मिळविले. आम्ही दलित नेते आहोत या अजेंड्याखाली निळ्या झेंड्याचा वारंवार वापर झाला आणि नकळत समाजाची फसवणुक करण्यात आली. खरंतर दलित चळवळीचा इतिहास पाहिला तर डॉ. बाबासाहेबांच्या नंतर अगदी कोणीचे समाज उद्धारक म्हणून नाव घ्यावे आणि हेवा वाटावा असे नाव अंत:करणातून बाहेर येत नाही. कारण, जातीच्या नावाखाली प्रस्तापित पक्षांनी दलित चळवळीत फुट पाडली आणि डोक्यावरचड माणूस नको तर कानाखालचा माणूस पसंत करुन समाजकल्याण मंत्रीपद सगळता फारसे काही पदरात दिले नाही. त्यामुळे, दुर्दैवाने ना विद्यार्थ्यांची उन्नती झाली ना समाजाची. आज एकतरी सामान्य उदा. दाखवून दिले पाहिजे. की, ज्याच्या पाठीशी मंत्र्याने किंवा नेत्याने हात ठेऊन त्यास लढ म्हटले आहे. अशक्य.! आणि असले तरी अगदी बोटावर मोजता येईल इतकेच. त्यामुळे, येथील नेत्यांनी समाज सक्षम नाही तर दुबळा करुन निव्वळ कार्यकर्ते घडविणे आणि बिघडविण्याचे काम केले हेच इतिहास सांगतो आहे.
आता एक साधं उदा. घेऊ. खा. रामदास आठवले यांनी केंद्रात आणि राज्यात प्रतिनिधित्व केले आहे. मात्र, त्यांचा दलित समाजासाठी असा एकच उपक्रम दाखवून द्यावा. ज्याचा फायदा अगदी गावकुसाबाहेर राहणार्या झोपडपट्टीपर्यंत गेला आहे. ते अनेकदा समाजकल्याण मंत्री राहिले आहेत. मात्र, दुर्दैव असे की 2018 पासून आधिच्या काही शिष्यवृत्त्या अद्याप विद्यार्थ्यांना मिळालेल्या नाहीत. कसे शिकणार त्याच्या कार्यकर्त्यांची मुले? कशी मोठी होणार बाबासाहेबांची लेकरं? त्यामुळे कधीकधी अनेकांना प्रश्न पडतो की, येथे गल्लीत गोंधळ घालुन दिल्लीत मुजरा करणे यासाठी हे मंत्रीपद आहे की काय? उपयोग तरी काय या मंत्रीपदाचा? ना त्यांच्या एखाद्या कार्यकर्त्याला मोठी संधी मिळाली ना कधी अपवाद सोडून कोणाला महामंडळ मिळाली. त्यांच्यासोबत अगदी कॉलेज जीवणापासून चटणी मिर्ची खात पायी चळवळी करीत फिरणारे कार्यकर्ते आज पडक्या घरांमध्ये राहतात. काल जे महाराष्ट्रात वादळ वारा निर्माण करुन डरकाळ्या फोडीत होते. तेच कार्यकर्ते आज खिन्न पारव्यासारखे घरात पडून आहेत. आनंदाने फक्त इतकेच सांगतात. आपले आठवले साहेब केंद्रात मंत्री आहे. परंतु ज्या आठवलेंनी कार्यकर्त्यांच्या ऐन जावानीतले रक्त शोषून घेत खर्च्या काबीज केल्या. त्यांचे फावले मात्र, अंगावरची कातडी सुकूण गेली मात्र बाबासाहेबांची चळवळ म्हणून अनेकांनी आपले उभे आयुष्य दान करुन रक्त अटविले आणि आंबेडकरी विचारांचा हा गाडा पुढे लोटत राहिले.
कधीकाळी चितन केले तर एक गोष्ट लक्षात येते. आठवले यांनी एक हाती सत्ताचा उपभोग घेतला. त्यांनी राज्याभर चळवळीच्या नावाखाली स्वत:मागे बळ उभे केले. मात्र, त्यांनी स्वत:ला पर्याय म्हणून एकही व्यक्ती उभा केला नाही. कधी रिडालोस पुढे आली, कधी ऐक्याच्या वाल्गना झाल्या मात्र, तरी देखील चळवळीला वैचारिक विचारधारेचे नेतृत्व लाभले नाही. एक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू म्हणून प्रकाश आंबेडकर यांचे नाव 2015 ते 2019 पर्यंत प्रचंड चर्चीले गेले. बहुजन वंचित आघाडीच्या माध्यमातून एक वेगळी लाट आली पण आणि गेली पण. मात्र, संयमी आठवले यांनी पुरोगामीत्व आणि आंबेडकर वादाच्या नावाखाली कधी राष्ट्रवादी तर कधी काँग्रेस जवळ केली. राज्यात कोणालाच काही नको मात्र मला द्या. मीच चळवळ आणि मीच समाज असे सिद्ध करून नेहमी चळवळीतील नेत्यांचा वापर केला गेला. कोठे अन्याय झाला की रस्त्यावर आरडाओरड करायची समाज पेटून द्यायचा, त्यांच्या रक्ताला डवचाळले की, प्रस्तापित पक्षाचे नेते जागे होतात हीच मेक त्यांच्या लक्षात आली. त्यामुळे, फाद्यांवर घाव घालण्यापेक्षा त्यांनी थेट मुळावर घाव घातला आणि आठवले यांना प्रत्येकवेळी स्थिरस्थावर करुन चळवळीची मुस्कटदाबी केली गेली. आता या सर्व प्रकाराला त्यांच्यासोबत काम करणारे भले जाणते लोक आहेत. कारण, त्यांनीच आठवले या नावाला खतपाणी घालुन त्यात इतकी हावा भरली की, ते नेहमी हवेत राहिले आणि कार्यकर्ते व्याजाने पैसे काढून, जमिनी विकून त्यांचे फ्लेक्स लावणे, त्यांना पार्ट्या देणे, त्यांचे दौरे घडवून आणणे. याच ओझ्याने आज भलेभले कट्टर पँथर म्हातारे झाल्याचे पहावयास मिळत आहे. मात्र, साहेब अजुनाही दिल्ली दरबारी टिचीत बसून आहे.
अगदी काल परवा खा. आठवले म्हणाले, आता रिपार्ई पक्षात दम राहिला नाही. हे विधान बोलल्यानंतर त्यांना अगदी काहीच वाटले नसेल. मात्र, जे लोक आंबेडकरवादी या अर्थाने तळागाळात रिपाईचे काम करीत आहेत. त्यांचा तरी आठवले यांनी विचार करायला हवा होता. इतकेच काय! ज्या उद्देशाने त्यांचे सहकारी आजवर कवडीचा फायदा नसताना देखील तुमच्या मागे फिरतात, त्यांच्या भावनांचा तरी विचार करायला हवा होता, स्वत:चे भागले जरी असले तरी रिपब्लिकन या शब्दाची नाळ थेट बाबासाहेबांच्या अस्मितीशी जोडली आहे. याचा तरी त्यांनी विचार करायला हवा होता. हे असले बाश्कळ बोलणे म्हणजे सहज कविता केल्यासारखे त्यांना वाटले आहे. मात्र, रिपाई म्हणजे आठवले कदापि नाही. हे आता अनेक आंबेडकरवादी जनतेने त्यांना खडसावून सांगितले आहे. तर येणार्या काळात नक्कीच रिपाईत काय दम आहे. हे देखील त्यांना जनता दाखवून देईल. आज ज्या आठवले यांचे तारुण्य रिपाईने पँथरसारखे केले. आज त्याच रिपाईची अवहेलना ते आपल्या उतारवयात करू लागले आहे. म्हणजे अगदी आज आणि आत्ताही जी रिपाई तुम्हाला आमदार, खासदार आणि केंद्रात मंत्री करु शकते, तिच्यात दम नाही.! हे बोलणे त्यांच्या नैतिकतेला शोभते तरी कसे? त्यांच्या या वक्तव्याने ज्यांनी त्यांच्या मागे फिरुन आयुष्य पणाला लावले. आज प्रत्येक दिवसातला क्षण क्षण निरर्थक वाटू लागला आहे. कारण, आज खर्या अर्थाने आठवले यांनी या पक्षाचा वापर केवळ पद आणि वैयक्तीक प्रतिष्ठा कमविण्यासाठी केला आहे. असे आरोप त्यांच्यावर होऊ लागले आहे. तसेही आता रिपाईची चळवळ राहिली तरी आहे कोठे? ती भाजपमध्ये विलीन होऊ घातली आहे. कारण, कालपर्यंत आम्ही हिदुत्ववाद नाकारला, प्रतिगामीत्व नाकारलं, संविधानाच्या विरोधात अवाक्षर निघाले तर रक्तरंजीत क्रांती आम्हला मान्य होती, धर्म आणि कर्मठ रुढी परंपरा यांच्यावर आम्ही सदैव प्रहार करण्यास तत्पर होतो. आता मात्र, ते आम्ही अगदी सहज पचवू शकत आहे. त्यामुळे, कालची रिपाई भाजपची सख्खी बहिन म्हणून नांदू लागली आहे. त्यामुळे, एकवेळी खरं वाटतं साहेब तुमचं की आता रिपाईत दम राहिला नाही. मात्र, दुर्दैव इतकेच वाटते की, ज्या बाबासाहेबांनी रिपाईचा समग्र हेतू ठेऊन तिची उभारणी करण्याचे स्वप्न पाहिले होते. त्या स्वप्नांचा आज राजकारण आणि सत्तेच्या लालसेपोटी चुराडा झाल्याचे दिसते आहे. त्यामुळे, तुमची रिपाई तुम्हाला लकलाभ.! मात्र, खबरदार बाबासाहेबांच्या रिपब्लिकन स्वप्नांना कलंक लावाल तर हा समाज तुमच्या विरोधात तुमचे लॉकडाऊन तोडून रस्त्यावर उतरेल. कारण, जसे तुम्ही सत्तेला चिकटलात तसे हा दलित समाज बाबासाहेबांच्या विचारांना आजही चिकटून आहे. असे तुमच्याच पक्षातील नेते आपल्याला ठाणकावून सांगत आहे.
- सागर शिंदे
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 380 दिवसात 600 लेखांचे 87 लाख वाचक)