‘डोंगरची काळी मैना’ अडचणीत ! त्या मुलांच्या चेहर्‍याकडे पाहवेना.!


- आकाश देशमुख
रोखठोक सार्वभौम विशेष :- 
                               अकोले तालुक्यातील पश्चिम भागात घाटमाथ्यावर असणार्‍या राजूर परिसरातील रंधा माळेगाव जंगलात रानमेव्याचे आगमन झाले आहे. ‘डोंगरची काळी मैना’ या नावाने ओळख असलेल्या करवंदांचे राजुरच्या बाजारपेठेत आगमन झाले आहे. परंतु, कोेरोना या रोगाने संपूर्ण जगात थैमान घातल्यामुळे सगळीकडे बंद आहे. त्यामुळे आदिवासी भागात पिकणारी ही करवंदे तोडायला पण कोणी तयार नाही. त्यांना योग्य बाजारपेठ नाही तर दळणवळणाची साधने बंद असल्यामुळे प्रवासी देखील रस्त्यावर दिसत नाही. त्यामुळे, डोंगरची काळी मैना झाडावरच सुकून चालली असून काही चिल्यापिल्यांच्या हाताला जो दोन पैसा मिळणार होता. तो देखील दुर्मिळ होऊ लागल्याचे चित्र आदिवासी भागात दिसू लागले आहे.
                         करवंदाचा सिजन हा एप्रिल व मे महिन्यातच असतो. डोंगराळ भागात पिकणारा हा रानमेवा तसा दुर्मिळच. पण चवीने आंबट गोड पण चवीष्ट असणारे हे फळ बघताक्षणीच कुणालाही हेवा वाटावा असंच आहे. डोंगराच्या चढ उताराला सध्या करवदांच्या असंख्य जाळ्या ह्या काळ्याभोर फळांनी भरगच्च लगडलेल्या अवस्थेत दिसून येत आहे. रंगाने काळ्या व डोंगराच्या पायथ्याशी हे फळ आढळत असल्याने या करवंदालाच ‘डोंगरची काळी मैना’ या नावानेही ओळखलं जातं. त्यातच शाळेला सुट्ट्या लागल्याने बरेचशी शाळकरी किलबिल कंपनी पाटी घेऊन भल्या सकाळीच अनवाणी पायाने जंगलाची वाट धरताना आता दिसु लागली आहेत.

तांदुळ हवे आहेत का?

         
    पाटीभर करवंद खुडायची आणि राजुरच्या बाजारपेठेची वाट धरायची असा नित्याचाच कार्यक्रम या चिमुरड्यांचा होऊन बसलाय. पळसाच्या किंवा चांद्याच्या पानाचा डोमा तयार करायचा आणि राजुरच्या बस स्टँडवर एसटी बस भोवती जोरात करवंद घ्या..करवंद.., अशी साद घालत ही चिमणी पाखरं अगदी ठेक्यात करवंद घेण्याची प्रवाशांना विनंती करताना दिसत आहेत. तर भंडारदरा व हरिश्चंद्रगड पर्यटनासाठी आलेली एखादी गाडी दिसली तर करवंद विकणारी ही किलबिल टोळी त्या गाडीलाच गराडा घालतात. त्यावेळी नक्की कोणाची करवंद विकत घ्यावी हा मोठा प्रश्न भंडारदरा,  हरिश्चंद्र, रंधा सहलीसाठी आलेल्या निसर्गप्रेमींना पडतो.ज्याची करवंद विकत घेतली जातील त्या मुलाला आभाळ ठेंगणं झालेलं असतं. एक करवंदाचा डोमा साधारणत: पाच ते दहा रुपयापर्यंत विकला जातो. दिवसभरात शंभर ते दिडशे रुपयापर्यंत या मुलांची विक्री होते. तर रंधा, माळेगाव, केळुंगणया गावावरून वयोवृद्ध आजी छोटी-छोटी मुले ही पाच दहा किलोमीटर असणार्‍या गावांवरून येऊन करवंद विकत आहेत. त्यांना या करवंदाच्या विक्रीतून येणार्‍या पैशातून स्वत:च्या शाळेचा खर्च भागवायचा आहे. शाळा उघडल्यावर नविन ड्रेस, वह्या, पुस्तके घेण्याची ईच्छा या लहानग्यांनी बोलुन दाखविली आहे. तर काही चिमुकली ही घरखर्चासाठी आई वडिलांना मदतीचा हात पुढे करत आहे. काही ठिकाणी करवंदे घ्या आणि भाकरी द्या. अशी परिस्थिती काही मागास भागांमध्ये पहायला मिळत आहे. अर्थात हे फळ त्यांची एक प्रकारे रोजीरोटीच आहे.
         उन्हातान्हात आदिवासी मुलांची चरितार्थासाठी चाललेली ही पायपीट बरीच काही शिकवणारी असल्याची भावना काहीजन बोलून दाखवतात तर उडदावणे, पांजरे, घाटघर, शिंगणवाडी या अतिदुर्गम आदिवासी भागातील महिलाही सकाळी सहा वाजल्यापासून करवंद गोळा करण्यासाठी काटेरी जाळीत घुसून करवंद खुडत असतात. घाटघर, शिंगणवाडी, मुरशेत, बारी, रतनवाडी, कोलटेंभे, कुमशेत पाचनई शिरपुंजा जानेवाडी अंबित या परिसरात करवंदाचे साम्राज्य हे मोठ्या प्रमाणात पसरलेले आहे. या भागामध्ये राहाता, शिर्डी, राहुरी, कोल्हार, संगमनेर, अकोले सारख्या प्रगतशिल गावामधुन काही व्यापारी हे घाटघर परिसरात येऊन मिठाच्या मोबदल्यात किंवा 10 ते 15 रु किलोने कवढी मोल भावाने खरेदी करतात.
                          या रानमेव्याला सध्या फक्त राजुर, अकोले, घोटी तसेच शेंडी-भंडारदरा अशाच ठिकाणी बाजारपेठ उपलब्ध असते. आदिवासी महामंडळ हे आदिवासी भागातून हिरडा सारख्या मालाची खरेदी करुन योग्य हमी भाव देत असते. या अतिदुर्गम भागामध्ये डोंगरची काळी मैना या नावाने ओळखली जाणारी करवंद जर आदिवासी महामंडळाने खरेदी केली व योग्य हमी भाव दिला तर आदिवासी पट्टयातुन नारायणगाव सारख्या एमआयडिसीमध्ये रोजगारासाठी जाणारा लोंढा हा थबकला जाऊ शकतो. ग्रामीण आदिवासी बांधव हा करवंदाच्या रुपाने नवीन रोजगार तयार करुन आपल्या संसाराला निश्चितच हातभार लावु शकतो. या डोंगरी मैनेचे जर आकर्षक असे पॅकिंग तयार करुन ते पुणे व मुंबई सारख्या बाजारपेठेत  महामंडळाने पाठवली तर निश्चितच ही काळी मैना ग्राहकांच्या पसंतीस उतरण्याचा मार्ग खुला होईल.
         कुमशेत, पेठेचीवडी, पाचनई, शिरपूंजे या भागात गेलो असता आदिवासी बांधवांच्या उपजीविकेला लॉकडाऊनमुळे पूर्ण विराम मिळाला आहे. त्यांना अत्यावश्यक गोष्टींसाठी तारेवरची कसरतच करावी लागत आहे. उपजीविका असलेले करवंद, जांभळ, तोरणं, विकल्यावर दोन चारशे रुपये सुटायचे व किराणा बाजार सुटायचा. पण, ह्या वर्षी कोरोनामुळे आदिवासी बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे प्रशासनाने दुगर्म भागात दुर्लक्ष करू नये- अजय भडांगे (राजूर)
         यावर्षी काही अज्ञात व्यक्ती मुद्दाम होऊन डोंगरांना आग लावीत असुन या आगीच्या भक्षस्थानी या करवंदाच्या जाळ्या सापडत असुन त्याचे अस्तित्व संपत चालेले आहे. याशिवाय नविन झाडेही लावली जात नसल्याकारणाने रंधा, माळेगाव, भंडारदरा गावाच्या आसपास सापडणार्‍या करवंदाच्या जाळ्याही सापडणे अवघड झाले. वनविभागाने या झांडाचे संगोपन करणे गरजेचे झाले आहे. - चंद्रकांत पवार (रतनवाडी)
============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------


(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 300 दिवसात 360 लेखांचे 27 लाख वाचक)