अखेर "सरकार" व "प्रशासन" मुक्कामी सत्याग्रहाला नतमस्तक, कोतुळ पुलाचा नारळ व तोलर खिंडीवर हथोडा पडणार.!
काम केलं नाही तर याद राखा.! |
किसान सभेने कोतुळ सातेवाडी परिसरातील ज्वलंत प्रश्नांसाठी सुरू केलेल्या मुक्काम सत्याग्रहाची आज 12 व्या दिवशी यशस्वी सांगता झाली. कोतुळ पुलाचे काम त्वरित सुरू करा, तोलर खिंड फोडून कोतुळ सातेवाडी परिसर मुंबई महामार्गाला जोडा, कोतुळ येथे पोलीस स्टेशन मंजूर करा, परिसरातील रस्ते, वीज, पाणी, शिक्षणाचे प्रश्न मार्गी लावा या प्रमुख मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली कोतुळ येथे 3 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांचा मुक्काम सत्याग्रह सुरू करण्यात आला होता. कोतुळ पुलाच्या कामाची निविदा मंजूर करून प्रत्यक्ष वर्क ऑर्डर काढण्याची प्रक्रिया केल्या शिवाय व तोलर खिंडीसह इतर 29 मागण्यांवर ठोस कार्यवाही झाल्याशिवाय माघार घेणार नाही अशी भूमिका आंदोलनाचे नेते कॉम्रेड सदाशिव साबळे व नामदेव भांगरे यांनी घेतली होती.
दोन वेळा आ.डॉ. किरण लहामटे व अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा करूनही वर्क ऑर्डर व ठोस कारवाईच्या मागणीवर आंदोलक ठाम राहिल्याने मुक्काम सत्याग्रह 12 दिवस सुरू राहिला. थंडी गराड्यात रात्रंदिवस सुरू असलेल्या या सत्याग्रहाची प्रशासनाला व शासनाला अखेर दखल घ्यावी लागली. नगर, औरंगाबाद, नाशिक येथील जलसंपदाच्या कार्यालयांमध्ये मॅरेथॉन बैठका झाल्या, अखेर सत्याग्रहाच्या 12 व्या दिवशी जलसंपदा विभागाचे उत्तर महाराष्ट्राचे मुख्य अभियंता, श्री.किरण कुलकर्णी यांनी कोतुळ पुलाचे निविदा स्वीकृती पत्र देत वर्क ऑर्डर काढण्याचा मार्ग मोकळा केला. उर्वरित प्रक्रिया पूर्ण करण्याची हमी कार्यकारी अभियंता श्रीमती संगीता जगताप यांनी घेतली. पाच वर्षे प्रलंबित असलेल्या कोतुळ पुलाच्या कामाला यामुळे मोठी चालना मिळाली. तोलरखिंड फोडून रस्ता बनविण्याच्या प्रश्नालाही आंदोलनामुळे मोठी चालना मिळाली.
अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांनी याकामी सकारात्मक भूमिका घेत नगर व पुणे येथील संबंधित सर्व अधिकाऱ्यांची 18 फेब्रुवारी रोजी नगर येथे संयुक्त बैठक घेऊन याबाबत कार्यवाही सुरू करण्याचे आश्वासन दिले. सत्याग्रहामुळे पिंपळगाव खांड येथील ठाकरवस्तीला विजेची लाईन, फोफसंडी येथील मुठेवाडीला रस्ता, सातेवाडीच्या दुर्गम वस्तीला वीज, बेलापूर व परिसरातील वस्त्यांची वीज वाहिन्यांची दुरुस्ती, कोतुळ परिसरातील रस्त्यांचे प्रश्न यावेळी मार्गी लावण्यात आले.डॉ.अजित नवले, आ.डॉ. किरण लहामटे, विनय सावंत, तहसीलदार मुकेश कांबळे, पाटबंधारे विभागाच्या संगीता जगताप यांच्यासह वीजवितरण कंपनी, एस.टी. महामंडळ, बांधकाम विभाग या सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सत्याग्रहाच्या मंडपातच पाच तास खुली चर्चा करून हे प्रश्न मार्गी लावले.
आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी एकनाथ मेंगाळ, साहेबराव घोडे, किसन मधे, निवृत्ती डोके, शांताराम वारे, रविंद्र देशमुख, सचिन गीते, अरविंद देशमुख, हेमंत देशमुख, हेमंत देशमुख, तुळशीराम कातोरे, प्रकाश साबळे, राजू गंभीरे यांनी परिश्रम घेतले.
============