जे 1985 ला मामानं केलं, तेच भाच्यानं 2023 ला केलं त्यात काय वाईट झालं.! अखेर पुत्रप्रेमापोटी डॉ. सुधिर तांबे यांचे निलंबन.!
- सुशांत पावसे
सार्वभौम (संगमनेर) :-
सन 1985 साली आ. बाळासाहेब थोरात यांच्या राजकारणाची सुरवात अपक्ष उमेदवारीने झाली. तेव्हा देखील काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष अर्ज भरून ही संधी आपल्यासाठी निर्माण केली. त्यावेळी स्व.भाऊसाहेब थोरात यांची काँग्रेस प्रती असलेली निष्ठा सर्वाना ज्ञात होती. मात्र, हे बंड आ.थोरातांचे सुवर्णाक्षरांनी लिहले गेले. कारण, आ.बाळासाहेब थोरात हे तब्बल नऊ वेळा या मतदारसंघातुन प्रतिनिधित्व करत आहेत व राज्याचे काँग्रेसचे विधिमंडळाचे नेतृत्व करत आहे. आता तसाच प्रसंग पुन्हा सत्यजीत तांबे पुढे उभा राहिला आहे. कारण,नाशिक पदवीधरला सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. काँग्रेसने डॉ. सुधीर तांबेवर शिस्तभंगाची कारवाई करत त्यांचे काँग्रेस मधुन निलंबन केले आहे तर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीला पाठींबा नाही हे जाहीर करून एक प्रकारे तांबे कुटुंबियांसाठी काँग्रेसची दारे बंद केली. मात्र, सत्यजीत तांबे यांनी पक्ष जाहीर नसला केला तरी पदवीधरचे उमेदवारी अपक्ष करणार आणि लढणार. त्यामुळे, बावीस वर्षे काँग्रेस मध्ये संघर्ष केलेल्या या तरुण नेतृत्वाने हाती आलेली संधी गमवायची नाही यावर ते ठाम आहे.
1985 सालची पुनरावृत्ती पुन्हा होते का? असा प्रश्न राजकीय जनकारांना वाटत आहे. मात्र, 2007 साली सत्यजीत तांबे काँग्रेस कडुन जिल्ह्यापरिषद सदस्य झाले तेव्हा त्यांचे वय अवघे चोवीस वर्षे होते. तेव्हा खा.सुजय विखे, आ.निलेश लंके,आ. राहुल जगताप, आ. आशुतोष काळे,आ. प्राजक्त तनपुरे हे कुठे नव्हते. ते आता आमदार खासदार झालेत. पण,आमदार खासदार होत असताना खा. सुजय विखे यांना काँग्रेस सोडुन भाजपचा झेंडा हाती घेवा लागला तेव्हा ते खासदार झाले. आ. निलेश लंके यांना शिवसेना सोडुन राष्ट्रवादीचा झेंडा हाती घ्यावा लागला तेव्हा ते आमदार झाले. हेच आ. आशुतोष काळे, राहुल जगताप,प्राजक्त तनपुरे यांना पक्ष बदलावा लागला तेव्हा आमदार खासदार झाले. त्यामुळे, सत्यजीत तांबे यांनी भाजपचा विचार केला तर काही वावगं वाटणार नाही. कारण, राजकारणात आलेली वेळ परत येत नाही. ही संधी आहे या संधीचे सोने करायचे हाच निर्णय त्यांनी घेतला असावा असे राजकीय अभ्यासकांना वाटते.मात्र,"सत्यजीत" नावाचा सूर्योदय होतो की सुर्यास्त हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरेल.
दरम्यान, सत्यजीत तांबे यांनी वयाच्या सतराव्या वर्षी विद्यार्थी काँग्रेस मध्ये सक्रीय सहभाग घेतला. विद्यार्थी काँग्रेस मध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर त्यांनी निवडणुकीच्या राजकारणात काम केलं. 2007 साली वयाच्या चोवीसव्या वर्षी ते काँग्रेसकडुन जिल्हापरिषद सदस्य झाले.त्यावेळी सत्यजीत तांबे याना जिल्हापरिषदेचे अध्यक्षपदासाठी डावले. वास्तविक तेव्हा शालिनी विखे पाटील यांच्यासोबत वाटाघाटी अंती सव्वा-सव्वा वर्षे ठरले होते. पण, तसे झाले नाही. पुन्हा 2012 साली जिल्हा परिषदेला काँग्रेसकडुन निवडुन आले पण, जिल्हापरिषदेच्या उपध्यक्ष पदाला पुन्हा डावले. त्यानंतर, 2011 ते 2014 साली काँग्रेसचे उपाध्यक्षपद स्वीकारले. पुढील काळात सत्यजीत तांबे यांना प्रदेश अध्यपदाची जबाबदारी मिळाली त्यांनी चलो पंचायत अभियान, सुपर 60 अभियान हा 2019 विधानसभेला काँग्रेसला उभारी देणारा ठरला होता. बावीस वर्षे उमेदीचे काँग्रेसला दिली. काँग्रेसने कुठं ही मागच्या दाराने विधान परिषदेवर, राज्यसभेवर विचार केला नाही. आज पदवीधरची उमेदवारी देण्याची वेळ आली तर एबी फॉर्म वडिलांच्या नावाने दिला. त्यामुळे, अपक्ष उमेदवारी भरावी लागली. मात्र, जे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष भाजप कडुन खासदार म्हणुन निवडुन आले नंतर राजीनामा देऊन काँग्रेस मध्ये आले त्यांना प्रदेश अध्यक्ष केलं ते आता सत्यजीत तांबेच्या विरोधात बोलायला लागले. सत्यजीत तांबे यांनी अपक्ष फॉर्म भरला तर अनेक काँग्रेसच्या नेत्यांच्या पोटात दुखायला लागले. काँग्रेसचा पाठींबा नाही अशी वलग्ना करायला लागले. पहाटेचे शपथ विधी करणारे नेत्यांनी देखील आ. थोरात यांच्याकडे बोट केले. मात्र, सत्यजीत तांबे यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली.
दरम्यान, नाशिक पदवीधर मधुन डॉ. सुधीर तांबे हे पहिल्यांदा अपक्ष निवडुन आले. त्यांनी या पदवीधरच्या नसा अगदी बारकाईने ओळखल्या. त्यामुळे, ते पुढील दहा वर्षे या मतदारसंघावर आपले स्थान टिकवू शकले. आता पुन्हा मुलाचा अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. पण, पुर्वी सारखी परिस्थिती या मतदारसंघात आता नाही. आता कुठल्यातरी राजकीय पक्षाचा आधार घ्यावा लागेल असे राजकीय अभ्यासकांना वाटते. त्यामुळे, इतके वर्ष वाट पाहुन ही मिळत नसलेली संधी साध्य करायची असेल तर हीच वेळ आहे हे कदाचित भाजपच्या नेत्यांनी ही सत्यजित तांबे यांना पटवून दिले असेल. त्यामुळेच वडिलांनी या मतदारसंघात निर्माण केलेल्या यशस्वी खेळ पट्टीवर कोणाची ही मुलाहिजा न ठेवता आक्रमक पणे फलंदाजी करण्यास तयार झालेले सत्यजित तांबे यांना कवर करण्यासाठी आ. बाळासाहेब थोरात पडद्यामागुण कोणती भूमिका बजावतात याची उत्सुकता संपूर्ण राज्याला आणि जिल्ह्याला आहे. एक मात्र नक्की की सत्यजीत तांबे यांची उमेदवारी मामासाठी म्हणली तर डोके दुःखी नाहीतर भविष्यात भाजपमध्ये जाण्यासाठी मार्ग सुकर करण्यासाठी उपयुक्ततेची ठरणार का? हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.
भाजपच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरवर शाई फेकली त्याचा फोटो आणि पोस्ट व्हायरल केली. त्यांनी सत्यजीत तांबे यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्याचा प्रयत्न देखील केला. पण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजीत बाबत नेहमी स्तुतीसुमने उधळली. त्यांनी सत्यजीत तांबेचे नेहमी तोंडभरून कौतुक केले तर प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी किंचितही विरोध केला नाही. इतकेच काय! अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री ना. विखे पाटील यांनी सत्यजीत तांबे भाजपात आले तर त्यांचे स्वागतच आहे असे बोलुन येण्याचा मार्ग सोयीस्कर केला. परंतु, अपक्ष उमेदवारी दाखल करून तीन दिवस उलटुन गेल्यानंतर ही सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारी बाबत खुद्द आ.बाळासाहेब थोरातच चुप्पी सोडायला तयार नसल्याने तांबेच्या उमेदवारीचे गुपीत अजुनही उलगडायला तयार नाही.