धक्कादायक.! जेथे त्याची प्रेयसी जाळली, तेथेच त्याला ठार केले.! जान के बदले जान.! दोन फिर्यादीत 13 जणांवर गुन्हे.!
सार्वभौम (संगमनेर) :-
मुर्खासारखे प्रेम हा प्रकार किती भयानक असतो याची प्रचिती संगमनेर येथे दिसून आली. एका व्यक्तीचे दुसर्याच्या पत्नीसोबत प्रेम संबंध होते. तो तिला घेऊन जातो आणि याची बायको तिला पुन्हा आणुन तिच्या नवर्याकडे सोडवते. दोन कुटुंबात वाद होतो आणि पळुन गेलेली महिला अचानक आत्महत्या करते. यात एकाच कुटुंबातील दहा जणांवर गुन्हा दाखल केला जातो. माझ्या पत्नीशी याने प्रेमसंबंध ठेवल्यानेच तिने आत्महत्या केली अशी धारणा झाल्याने प्रियकराची हत्या केली जाते. ती ज्या ठिकाणी जाळली, त्याच ठिकाणी त्याचा मृतदेह पडलेला दिसून येतो. हा प्रकार कोठे युपी-बिहारमध्ये नव्हे, तर खुद्द संगमनेर तालुक्यातील डोळासणे परिसरात रविवार दि. 13 मार्च 2021 रोजी घडला. याप्रकरणी तिघांच्या विरोधात घारगाव पोलीस ठाण्यात कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, डोळासणे परिसरात एका 37 वर्षीय तरूणाचा विवाह झालेला असताना त्याचे 31 वर्षीय एका अन्य विवाहीत महिलेशी प्रेमसंबंध होते. या प्रकारामुळे त्यांच्यात वारंवार वाद होत होते. दरम्यानच्या काळात या दोघांनी गाव सोडले आणि तीन ते चार महिन्यांपुर्वी हे दोघे चाकन येथे राहत होते. मात्र, हा सर्व प्रकार या 37 वर्षींय पुरुषाच्या पत्नीस सहन झाला नाही. केव्हार यांचे असले चाळे सहन करायचे असे म्हणत यांनी थेट चाकन गाठले आणि संबंधित महिलेला तेथून आणून तिच्या पतीच्या ताब्यात देऊन टाकले. आता हा झालेला प्रकार जगजाहिर झाल्याने तीन थेट आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. सोमवार दि. 14 मार्च 2022 रोजी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास या महिलेने विषारी औषध प्राषण करुन स्वत:च्या जीवनाला पुर्णविराम दिला. मात्र, जाताजाता जो काही प्रकार तिच्या आयुष्यात घडला होता. त्याला तिने कागदावर अधोरेखीत केले आणि तो चिठ्ठी तेथे ठेवून दिली. त्यानंतर तिच्या पतीने दिलेल्या फिर्यादीनुसार 10 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
दरम्यान, तिने आत्महत्या केली. हा प्रकार तिच्या प्रियकराला समजला असता तो सोमवार दि. 14 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घरी आला. एकीकडे त्याच्यावर गुन्हा दाखल असल्यामुळे पोलीस त्याचा शोध घेत होते. तर हा आपल्या प्रेयसिचा शोध घेत होता. त्याने आपल्या वडिलांना विचारणा केली. मात्र, त्यांच्याकडून त्यास फारसे समाधानकारक उत्तर मिळाले नाही. तिच्यावर कोठे अंत्यसंस्कार केले हे मला सांगा असे तो विचारत होता. मात्र, असल्या प्रश्नाचे उत्तर वडिलांकडे नव्हते. त्यावेळी तो घराबाहेर पडला. एका मंदिराला दरवाजा बसवायचा आहे असे म्हणून तो तेथून चालता झाला. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलीस गाडी गावात आली होती. मात्र, तो मिळून आला नाही. शेवटी बाप-बाप असतो. त्यांच्या लक्षात आले. गुन्हा दाखल झाला, पोलिसांना हा मिळून आला नाही. मग हा गेला तरी कोठे? म्हणून मुलाचे शब्द त्यांना आठवले. तिला कोठे जाळले असे तो विचारत होता. त्यामुळे वडिलांंनी थेट स्मशानभूमी गाठली. तेव्हा त्यांना पाहिले की, मयत मुलगी आणि तिचा पती यांच्या मुलासोबत भांडत होते. तेव्हा यांनी सर्वांना समजून सांगितले आणि ते तेथून चालते झाले.
दरम्यान, दुसर्या दिवशी म्हणजे दि. मंगळवार दि. 15 मार्च 2022 रोजी 37 वर्षीय मुलाचे वडिलांना जुन्नर कोर्टात केस होती. त्यामुळे ते सकाळीच 8 वाजण्याच्या दरम्यान तिकडे गेले होते. न्यायालयीन कामकाजात असताना त्यांना एक फोन आला की, तुमचा मुलगा हा डोळासणे येथील स्मशानभूमीत मृत अवस्थेत पडलेला आहे. हे सर्व ऐकल्यानंतर त्यांनी थेट गाव गाठले. त्यांचा मुलगा रक्ताळलेल्या अवस्थेत स्मशानभूमीत पडलेला होता. त्याला जबरी मारहाण झालेली होती. डोळ्यांच्या भोवती खोलवर जखम आणि रक्तस्त्राव होत होता. तेव्हा, वडिलांच्या लक्षात आले की, हा प्रकार कोणी केला आहे. तेव्हा, त्यांनी मुलावर अंत्यसंस्कार केले. ज्या ठिकाणी मयत मुलाची प्रेयसी जाळली, त्याच ठिकाणी अगदी काही तासात याच्या देखील मृतदेहाला आग्नीदाग देण्यात आला. त्यानंतर याच्या वडिलांनी थेट घारगाव पोलीस ठाणे गाठले आणि तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोलीस करीत आहेत.